छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. दहावीच्या परीक्षा काही दिवसांत सुरू होणार आहे. या परीक्षांमध्ये कॉपी मुक्तीसाठी शालेय शिक्षण विभाग विविध योजना राबवीत असते. यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत इंग्रजी, गणिताच्या विषयाला होणारी कॉपी रोखण्यासाठी केंद्रात प्रवेश करतानाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
आता बारावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर झालेला आहे. गणिताचा पेपर बाकी आहे. त्याशिवाय दहावीच्या परीक्षाच सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यास महागात पडू शकते. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रात प्रवेश करताना घेतलेल्या झाडाझडतीचे केलेले चित्रीकरण जपून ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना दिलेल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातून देण्यात आली.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी १७ पथकेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाची ७, महसूल विभागाची १०, अशा एकूण १७ पथकांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय संपर्क अधिकारी म्हणून खातेप्रमुखांच्या नेमणुका केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटी देण्याचेही नियोजन केले आहे.
दोन पेपरचे होणार चित्रीकरणदहावी-बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपीचे गैरप्रकार इंग्रजी व गणिताच्या पेपरला होत असतात. त्यामुळे या दोन पेपरचे चित्रीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, देवगिरीसारख्या महाविद्यालयात सर्वच पेपरला विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देताना तपासणी करतानाचे चित्रीकरण करण्यात येत आहे.
दहावीची २३२, तर बारावीची १६४ केंद्रांवर परीक्षाछत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी २३२ परीक्षा केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांवर दहावीचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्याशिवाय बारावीच्या परीक्षेसाठी १६४ केंद्रांवर प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात झाली आहे.
विद्यार्थी संख्या- दहावीला ६६,९८९ विद्यार्थी-बारावीला ६३,२१७ विद्यार्थी
विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारावरच झाडाझडतीमाध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयात परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची नियमानुसार प्रवेशद्वारावरच झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे परीक्षा केंद्रात कॉपी घेऊन जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.- प्रा. नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय