औरंगाबाद : जवाहर नगर पोलिस ठाण्यात अमानविश्व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा संरक्षण शास्त्राच्या विषयावर अभ्यासाचा तास भरला. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याच्या कामकाजाची प्रक्रिया समजावून सांगितली. गुन्हेगाराला पकडण्यापासून ते गुन्ह्याचा शोध कसा घेतला जातो, याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
संपूर्ण शहरावर पोलिसांचे कसे लक्ष असते, सीसीटीव्ही फुटेज कसे तपासले जाते, वायरलेस मेसेज, गोपनीय शाखा, तक्रार कक्ष, एफआयआरच्या नोंदी कशा घेतल्या जातात व त्या ऑनलाइन पद्धतीने देशभरातील पोलिस ठाण्यांत कशा उपलब्ध होतात आदींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
लहान मुलांनी फोन हाताळणे शक्यतो टाळलेलेच बरे, असाही सल्ला त्यांनी दिला. या क्षेत्रभेटीत पोलिस उपनिरीक्षक वसंतराव शेळके, पोलिस नाईक विजय वानखेडे, महिला पोलिस कर्मचारी आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे सहशिक्षक प्रदीप राठोड, सुधाकर गुंजाळ, बिजू मारग; तसेच मुख्याध्यापक बद्रीनाथ थोरात यांचीही यावेळी उपस्थिती होती.