औरंगाबाद : बारावीत चांगले गुण मिळाले. पहिल्या प्रयत्नात नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने पुन्हा तयारी केली. एक दिवसावर नीट परीक्षा आली असून अभ्यासासाठी खोलीत गेलेल्या १८ वर्षीय ऋतुजा गणेश शिंदे या विद्यार्थिनीने मध्यरात्री गळफास घेतला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आली. त्यामुळे जयभवानीनगर गल्ली नंबर १० मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी ऋतुजाने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून ८८ टक्के गुण मिळवले होते. दहावीनंतर ती नीट परीक्षेची तयारी करत होती. पहिल्या प्रयत्नात तिला २९६ गुण मिळाले होते. मात्र, वैद्यकीय शिक्षणाला तिला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा नीटच्या तयारीला लागली. रविवारी नीटची परीक्षा होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री सहपरिवार जेवणानंतर तिने आईजवळ बसून अभ्यास केला. त्यानंतर घरातील वरच्या मजल्यावरील तिच्या खोलीत जाऊन रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला.
दरम्यान, वडील गणेश शिंदे हे रात्र पाळीसाठी कंपनीत गेले होते. शनिवारी सकाळी वडील ड्युटीवरून परतल्यावर आठ वाजण्याच्या सुमारास ऋतुजाने गळफास घेतल्याचे समोर आले. परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज काही नातेवाईकांनी व्यक्त केला असून नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.