औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.जिल्ह्यात सध्या उन्हाळी सुट्टीत जवळपास २०० जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना लगेच आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी व फळे देण्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानंतरही १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडे, फळे देण्याची ही योजना कायम सुरू ठेवली जाणार आहे. जि. प. शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी वर्गात शिकणाऱ्या दुष्काळी अथवा टंचाईसदृश भागातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर शालेय पोषण आहारात योजनेंतर्गत तीन दिवस पूरक आहार देण्यासाठी आठवड्याला प्रतिविद्यार्थी १५ रुपये निधी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.दरम्यान, या योजनेचे स्वागत शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, शरद शहापूरकर, विनोद पवार, मच्छिंद्र भराडे, किशोर कदम, मीरा जाधव, शगुफ्ता फारुकी, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत आदींनी केले आहे. पूरक आहारासाठी झालेला खर्च मुख्याध्यापकांना, बचत गटांना किंवा संबंधित यंत्रणेला अग्रीम स्वरूपात नियमितपणे देण्यात यावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.------------