छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्येच्या १९ गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत अद्ययावत अभ्यासिका उभारण्यात येत आहेत. यापैकी सध्या ११ अभ्यासिकांचे बांधकाम सुरू आहे. साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत या अभ्यासिका अस्तित्वात याव्यात, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. तथापि, दर्जेदार बांधकामासाठी उपकरातून प्रति अभ्यासिका २० लाख रुपये खर्च करणार आहे. मग, यासाठी आवश्य स्पर्धा परीक्षा अथवा उच्चशिक्षणाच्या पुस्तकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, जि. प. पंचायत समिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी यासंदर्भात सांगितले की, जिल्हा परिषदेच्या उपकरातून १९ अभ्यासिकांच्या बांधकामासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, याव्यतिरिक्त ग्रामपंचायतींनी त्यात अजून पाच-दहा लाख रुपये टाकणे अपेक्षित आहे. साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंत या अभ्यासिकांची कामे पूर्ण होण्याच्या दिशेने प्रशासन प्रयत्न करीत आहे. असे असले तरी मार्च २०२४ अखेरीस या सुसज्ज अभ्यासिका तरुणांसाठी उपलब्ध करण्याचा मानस आहे.
अभ्यासिकांसाठी पुस्तके, फर्निचर आदींसाठी निधीची तरतूद काय, या प्रश्नावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामावत म्हणाले, यासाठी आम्ही ‘सीएसआर’ निधी, जिल्हा नियोजन समिती अथवा लोकप्रतिनिधींकडे निधीसाठी मदत घेणार आहोत. गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास गावातच करता यावा, यासाठी राज्यातील औरंगाबाद जिल्हा परिषदेने अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचा हा पहिलाच अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. बाह्यस्त्रोतांकडून पुरेशी आर्थिक मदत मिळालीच नाही, तर एवढा मोठा खर्च करून उभारण्यात आलेला हा डोलारा पुढे पुस्तकांविना ओस पडू नये, अशी चर्चा जि. प. वर्तुळात आहे.
आठ अभ्यासिका निविदा प्रक्रियास्तरावरसध्या वैजापूर तालुक्यात बोरसर व वाकला, गंगापूर तालुक्यात सावंगी (लासूर स्टेशन), फुलंब्री तालुक्यात बाबरा, सिल्लोड तालुक्यात बोरगाव सारवणी, उंडगाव, फर्दापूर, औरंगाबाद तालुक्यात गोलटगाव, सावंगी (हर्सूल), पैठण तालुक्यात बालानगर, चितेगाव या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अभ्यासिकेचे काम सुरू आहे. उर्वरित औरंगाबाद तालुक्यात तीसगाव, चौका, कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी, कुंजखेडा, नागद, करंजखेडा (जा), पैठण तालुक्यात दावरवाडी, विहामांडवा या ठिकाणी अभ्यासिकांची कामे निविदा प्रक्रियास्तरावर आहेत.