औरंगाबाद : मराठवाड्यातील आरोग्य, आदिवासी मुलींचे उच्चशिक्षण, मुलींचे शिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, महिलांचेआरोग्य, कुपोषण या विषयांवर विविध तज्ज्ञ मंडळी अभ्यास करणार असल्याची माहिती मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिली.
मराठवाडा विकास मंडळामध्ये समाजकल्याण, महिला बालकल्याण आणि आदिवासी विकास तसेच आरोग्य समितीच्या बैठकीत बेलखोडे बोलत होते. यावेळी मंडळाचे सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, शासकीय दंत महाविद्यालयचे डॉ.शिरीष खेडगीकर, स्त्रीरोग प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वाल्मीक सरवदे, मराठवाड्यातील आरोग्य, महिला व बालविकास, समाजकल्याण विभागचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मराठवाड्यात आदिवासींच्या मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ४८ टक्के आहे. त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी खिंवसरा, अरुंधती पाटील, सविता शेट्ये यांच्या पुढाकाराने अभ्यास समिती नेमण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणावरही अभ्यास करण्यात येणार आहे. भटक्या विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी राम राठोड यांच्या पुढाकारातून समिती अभ्यास करणार आहे. तर आदिवासी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेऊन सविस्तर अभ्यास प्राचार्य सुभाष टकले करणार आहेत. किनवट येथे आदिवासी भागातील मुलींसाठी नर्सिंग स्कूल व्हावे यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही बेलखोडे यांनी सांगितले. मराठवाड्यातील नर्सिंग प्रशिक्षण केंद्राबाबतचा अभ्यास अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.अंकुशे करणार आहेत.
कुपोषण निर्मूलनासाठी कार्यशाळा मराठवाड्यातील महिलांच्या आरोग्यावरील अभ्यास होणे महत्त्वाचे असून, यासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर आणि डॉ.क्रांती रायमाने अभ्यास करणार आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी डॉ.मोगरेकर काम करणार आहेत. तर मराठवाड्यातील कुपोषणाच्या संदर्भात येथील विद्यापीठाबरोबरच गृहविज्ञानशास्त्र महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजनदेखील करण्यात येणार असल्याचे बेलखोडे यांनी सांगितले.