-अशोकरावांचा विवादापेक्षा विकासाकडे लक्ष देण्याचा सल्ला
योगेश पायघन
औरंगाबाद : विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी शुक्रवारी कुंभेफळ (ता. औरंगाबाद) येथे एकत्र आलेल्या आ. अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे आणि बागडेंचे पारंपरिक विरोधक असलेले माजी आमदार कल्याण काळे यांच्यात खोचक शब्दबाणांचा जोरदार मारा झाला. एकमेकांविरुध्द केलेली टोलेबाजी आणि शाब्दिक फटकेबाजी चांगलीच रंगली. तिघांमधील या जुगलबंदीला मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी ‘भांडत बसण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्या’ असा सल्ला देत विश्राम देण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे नेते आ. बागडे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार कल्याण काळे यांच्यात आधी शाब्दिक जुगलबंदी रंगली. ज्यांच्याऐवजी तुम्ही मला मतदान करुन निवडून आणले असे कल्याण काळे, अशी कोटी बागडेनानांनी केली. त्यावर काळेंनी मतदारसंघातील रस्ते खड्ड्यांनी भरलेले असल्याचा टोला लगावला. त्यावर बागडेनानांनी काळेंना पुन्हा टोला लगावत १९८८ पासून मतदार संघाच्या विकासासाठी लढत असल्याचे स्पष्ट केले. या दोघांमधील संभाषणाचा संदर्भ घेऊन आ. दानवे यांनी कल्याण काळे यांच्यावर कोटी केली. काँग्रेस अजून विरोधी पक्षाच्याच भूमिकेत दिसत असल्याचे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोकरावांनी मग या तिघाही नेत्यांंना विवादापेक्षा पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांसारखे एकत्र येवून विकास खेचून आणण्याचा सल्ला त्यांनी दिला. राजकीय नेत्यांच्या टोलेबाजी आणि जुगलबंदीत कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याचाही कुंभेफळवासीयांना विसर पडला. चौक
चौकट...
काय म्हणाले नेते...
कल्याण काळे : गेल्या पाच वर्षांत युतीमध्ये काँग्रेसच्या आमदाराला निधी देताना विचार केला जात होता. आता बागडेनाना आमदार असतानाही कोरोडो रुपयांचा निधी दिला जातोय. गेल्या सरकारमध्ये नानांनी खूप रस्त्यांची कामे केली. पण, सध्या खड्ड्यांनी व्हाॅट्स ॲप फेसबुक भरले आहे.
अंबादास दानवे : आधीच्या नेत्यांची भाषणे एकूण काँग्रेस अजून विरोधी पक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडलेली दिसत नाही. गाऱ्हाणे मंत्र्यांना खासगीत भेटून मांडू शकतो. मी नांदेडला नुकताच दौरा करून आलो. नांदेडच्या गावागावात विकास झालेला आहे. नांदेडच्या धर्तीवर जिल्हाभरात विकास कामांसाठी निधी द्या, रस्त्याचे जाळे निर्माण करा.
हरिभाऊ बागडे : मी तिसऱ्यांदा मंत्र्यांसोबत या गावात आलोय. आम्ही २ पूल बांधून रस्त्याचे काम केले. त्यावर तुम्ही डांबरीकरण करताय. आनंदाची गोष्ट आहे. आता लाडसावंगी-करमाड आणि वनविभागाने अडवलेल्या कामांकडेही जरा लक्ष द्या.
अशोकराव चव्हाण : नाना, काळेंची जुगलबंदी ऐकली. हे चालत राहणार. पश्चिम महाराष्ट्राकडून विकासासाठीचा एकोपा शिकायला पाहीजे. कुंभेफळची ग्रामपंचायत आहे की नगरपालिका ? इथला फोटो घेवून मला नांदेडमध्येही असाच विकास करावा लागेल. मराठवाड्याच्या विकासाला झुकते माप देण्याचा प्रयत्न आहे. त्यात नांदेडबरोबर औरंगाबाद आहेच. त्यात पैठणलाही पुढे करू.