सोयगाव : सोयगाव आगारात उभ्या असलेल्या एका विना दरवाजाच्या एस.टी. बसमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क बिबट्याने (बछडा) आश्रय घेतल्याचे शुक्रवारी पहाटे पाच वाजता बस चालकाला दिसल्याने आगारासह शहरात घबराट पसरली आहे. सध्या सोयगाव परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यात सोयगाव बस आगार शहराच्या शेवटच्या टोकावर अजिंठा डोंगररांगांच्या पायथ्याशी शेतीक्षेत्रात आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजता चालक वसंत पाटील यांची ड्युटी असल्याने ते आगारात आले. आपली बस (क्र. एमएच-२०-डी-०८७९) ताब्यात घेण्यासाठी ते या विना दरवाजाच्या रात्रभर उभ्या असलेल्या बसमध्ये चढताच त्यांना हा बछडा पहुडलेला आढळल्याने त्यांना घाम फुटला. पाटील यांनी प्रसंगावधान राखून ते बाजूच्या बसवरील छतावर चढले व आरडाओरड केली. यामुळे लोक जमा झाल्याने गोंधळ झाला व हा बछडा जंगलात पसार झाला.चालक वसंत पाटील यांच्या पाठोपाठ सुरेश निकाळजे हेही आगारात आल्याने त्यांना डरकाळ्याचा आवाज आला. नंतर या दोघांनी घाबरुन आगारातून पळ काढला. बसमधील वन्यप्राणी बिबट्याचे पिलू असल्याचे प्रत्यक्षदर्शी चालक वसंत पाटील यांनी सांगितले. दिवसभर याच विषयावर शहरात चर्चा रंगली होती. येथे बिबट्यांचा वावर असल्याने या चर्चेला दुजोरा मिळतो.
एसटीत चक्क बिबट्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:15 AM