अविनाश मुडेगांवकर , अंबाजोगाईशहरातील सबजेलची इमारतीची दुरवस्था झाल्याने नव्या इमारतीचा प्रस्ताव होता. मात्र, १५ वर्षांपासून नव्या इमारतीचा प्रश्न काही मार्गी लागलाच नाही. त्यामुळे छोट्या-मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा आरोपींसह पोलिसांना बीडवारी करावी लागत असून, वेळ, पैसा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने आहे ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना बीडला हेलपाटे मारण्याचे कामच करावे लागते. याचा गैरफायदाही पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात घेते.किरकोळ गुन्ह्यातील आरोपींनाही अंबाजोगाई येथून बीडला पाठविण्यात येते. यासाठी आरोपीकडून पोलिस यंत्रणेतील लोक बीडला घेऊन जाण्यासाठी पैशाची मागणी करतात. काही वेळा तर खाजगी वाहन करून पोलिसांना आरोपींना न्यावे लागते. याचा भुर्दंड त्या आरोपीलाच विनासायास सहन करावा लागतो. किरकोळ स्वरुपातील चौकशांबाबतच्या जामीन अंबाजोगाई तहसील अंतर्गत व्हाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे. सबजेलची इमारत गेल्या पंधरा वर्षांपासून बंद असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ही जेलची इमारत बांधण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, या इमारतीचे काम अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. ही जेलची इमारत झाल्यास येथील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी व्यक्त केली.
सबजेल इमारतीची दुरवस्था
By admin | Published: December 20, 2015 11:26 PM