रऊफ शेख , फुलंब्री : तालुक्यातील गणोरी येथील सुपुत्राची सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी रथावरुन गावभर भव्य मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांकडून त्याचा सपत्नीक सत्कारही केला. या सोहळ्याने सैनिक भारावून गेला. हा कार्यक्रम रविवारी सकाळी 10 वाजता घेण्यात आला. प्रकाश सांडू जाधव असे भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेले जवान आहेत. 1 एप्रिल 2023 रोजी त्यांची 28 वर्षांची सेवा पूर्ण झाली.
रविवारी सकाळी गावात येताच त्यांची सजवलेल्या रथावरुन मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर आमदार हरिभाऊ बागडे व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी सभापती अनुराधा चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, सरपंच सरला संतोष तांदळे, पंडित उबाळे, संतोष तांदळे, विलास उबाळे, नामदेव काळे सह मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते
सैन्य दलातील कार्य प्रकाश जाधव हे 1995 मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरात येथील भूजमध्ये आलेल्या भूकंपानंतर त्यांनी भूकंपग्रस्त जखमींना खूप मदत केली होती. 2017 मध्येही गुजरातच्या बनासकांठा येते आलेल्या पूरानंतर त्यांनी पूरग्रस्तांना मोठी मदत केली. तसेच कोविड काळातही पालमपूर येथे दोन वर्षे बचाव कार्यात मदत केली. यामुळए त्यांना विशेष कोविड वारियर म्हणून सन्मानित करण्यात आले. या शिवाय अनेक ठिकाणी त्यांनी काम केले आहे.