सुविधांचा अभाव, ना फायर ऑ़डिट, ना वीज यंत्रणेची दुरूस्ती
बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नी तांडवाने आठ मुलींसह दहा बाळांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने सरकार जागे झाले असून त्यांनी राज्यातील सर्वच रुग्णालयाचे फायर ऑडिटचे आदेश दिले आहेत. मात्र, वैजापूर तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य
केंद्र असून त्यांच्या अंतर्गत उपकेंद्राचा समावेश आहे. वैजापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. या सर्व ठिकाणी कायम सुविधांचा अभाव असतो. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने या रुग्णालयात कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले. फायर ऑडिट झालेले नाही. अग्निशमन यंत्र आलेच नाही. विजेची तांत्रिक पद्धतीने जोडणी देखील झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयांचा कारभार रामभरोसेच सुरू आहे.
वैजापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय असून एकूण ११६ पदे मंजूर आहेत. ६९ कर्मचारी भरले असून ते कार्यरत आहेत. ४७ पदे रिक्त आहेत. तर तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून १३२ पदे मंजूर असून त्यापैकी ७४ कर्मचारी कार्यरत आहे. ५८ पदे रिक्त आहेत. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून मनूर, शिवूर, लोणी, बोरसर, लाडगाव, गाढे पिंपळगाव व बऱ्याच ठिकाणी उपकेंद्रे आहेत.येथील वीज जोडणी अनेक वर्षांपासून तपासलेली नाही. अग्निशमन यंत्र तर कोठे धूळखात पडले आहेत, याचा पत्ताच लागत नाही.
वैजापूर पासून काही अंतरावर असलेल्या लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात फरशी तुटलेली आहे. वायर उघडे पडले आहेत. फॅन नादुरुस्त आहेत. याच प्रमाणे संपूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेले आहे. अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहे. जागोजागी प्रभारीराज सुरू आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या सुविधाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. केंद्रप्रमुख, मुख्य वैद्यकीय अधिकारी
यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या दृष्टीने महत्वाच्या व
आवश्यक सुविधा, प्राथमिक गरजाकडे लक्ष
देण्याची गरज आहे. तरी देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. मग भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेसारखी घटना घडली की प्रशासन जागे होण्याचे ढोंग करते.
----
ही आहेत तालुक्यातील सहा
शिऊर, मनुर, लाडगाव. गाढे पिंपळगाव, बोरसर, लोणी
-----
फोटो : वैजापूर उपजिल्हा रुग्णालय