जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान शिक्षण विभागासाठी मोठा प्रश्न आहे. त्यासाठी संबंधित वर्गशिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाईचे संकेत शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता यावे, त्यांना गणित व विज्ञानाच्या संकल्पनांची उकल सहज व्हावी, अशी सक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र आठवीपर्यंत कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचा आभास निर्माण करून नववीत विद्यार्थ्यांना सरळ नापास करण्यात येत असल्याने त्यांचा विकास खुंटत आहे. त्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा येत आहे. त्यासाठी वर्षभराच्या कामकाजात दिरंगाई करणार्या वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाई केली जाणार आहे, असे शेवाळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लवकरच नववीचा अहवाल संचालकांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे. नववीपर्यंत लिहिता व वाचता येत नसेल तर शाळेत शिक्षण काय दिले, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेवाळे यांनी आश्चर्य व्यक्त केला. संस्था चालक संजय म्हस्के यांनी सांगितले, वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा, कौटुंबिक वातावरण या गोष्टीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणार्या आहेत. एकटा शिक्षकच सर्वकाही करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे राहणीमान, घराचा परिसर या बाबींचाही विपरित परिणाम शिक्षणावर होतो. दहावीचा निकाल घसरला तर संपूर्ण शाळेच्या गुणवत्तेचाच विचार करण्याची वेळ येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रगतीला शिक्षकच जबाबदार असल्याचे समजूर शिक्षण विभागाने शिक्षकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातही संभ्राम निर्माण झाला आहे. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचा आढावा घेणार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.
विषय शिक्षकांवर कारवाईचे संकेत
By admin | Published: June 01, 2014 12:15 AM