पैठण : शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या नाव व क्रमांकातील चुका दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने पैठणच्या तहसीलदारांनी तीन दिवसांची दुरुस्ती करण्याची मुदत दिली आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतिवृष्टीच्या अनुदानापासून तालुक्यातील २० गावांतील शेतकरी वंचित राहिल्याचे समोर आल्यानंतर छावा क्रांतिवीर सेनेने तहसीलदारांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर प्रशासकीय पातळीवर याबाबत दखल घेण्यात आली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील नावात चूक असणे, खाते क्रमांकात चूक असणे, खाते बंद असणे, सामाईक क्षेत्र असणे आदींमुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. दरम्यान या चुका दुरुस्त करून शेतकऱ्यांनी तलाठ्यांना दिल्या; मात्र त्या पुढील कार्यवाही तलाठ्यांनी न केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नव्हते. या बाबत छावा क्रांतिवीर सेनेचे अनिल राऊत यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन लक्ष वेधले. यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नांदर, बिडकीन, दाभरूळ पाडळी, विहामांडवा, गेवराई बाशी, कडेठाण बु., आंतरवाली खांडी, रहाटगाव, ढोरकीन, मुरमा, म्हारोळा, निलजगाव, तोंडोळी ब्राम्हणगाव, रांजणगाव खुरी, कोळी बोडखा, पोरगाव, इसारवाडी, नांदलगाव आदी गावांच्या तलाठ्यांना नोटीस बजावली आहे. तहसीलदारांच्या खरमरीत नोटिसीनंतर तलाठी कामाला लागले असून सोमवारी अनेक शेतकऱ्यांच्या दुरुस्ती केलेल्या याद्या सादर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय आहे नाेटिसीत...
तहसीलदारांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, कार्यालयाकडून वारंवार लेखी तोंडी, कारणे दाखवा नोटीस देऊनदेखील कामांमध्ये सुधारणा झालेली नाही. कामातील हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तीन दिवसांच्या आत सदरील शेतकऱ्यांचे खाते क्रमांक दुरुस्त करुन कार्यालयात जमा न केल्यास उपविभागीय अधिकाऱ्यांकडे शिस्तभंगविषयक प्रस्ताव सादर करण्यात येईल.