औरंगाबाद : औरंगाबाद-शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा डीपीआर, सिडको बसस्थानक चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपुलाचे तांत्रिक सर्वेक्षण व औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केंद्रीय सदस्य अलोक कुमार यांनी प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना दिले.
शुक्रवारी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर खासदार इम्तियाज जलील, अलोक कुमार, नागपूर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांची भेट झाली. तेव्हा खा. जलील यांनी औरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण, सिडको बसस्थानक चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती द्यावी, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड येथील औट्रम घाटातील बोगद्यासह अन्य पर्यायी रस्ता द्यावा, या विषयावर सविस्तर चर्चा झाली. तेव्हा अलोक कुमार यांनी शहर व औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सिडको चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपूल उभारण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्यासोबत संयुक्तरीत्या बैठक घेऊन तांत्रिक सर्वेक्षण करावे व तत्काळ अहवाल सादर करावा, कन्नड येथील डोंगर पोखरून औट्रम घाटातील बोगदा तयार करताना नैसर्गिक साधनसामुग्रीचे जास्त नुकसान न होऊ देता वाहतुकीसाठी अन्य पर्यायी रस्त्याबाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक काळे यांना दिले. शेंद्रा - बिडकीन कनेक्टिव्हिटी देखील महत्त्वाची आहे. यामुळे दोन ‘डीएमआयसी’चे दोन्ही औद्योगिक पट्टे जोडले जातील. या प्रकल्पावरही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खा. जलील यांनी निदर्शनास आणून दिले.
चौकट..................
अमरप्रीत चौकात उड्डाणपुलाच्या कामाला गती द्यावी
चिकलठाणा विमानतळासमोर उड्डाणपूल तयार करण्यात आला, तर भविष्यात सिडको चौक (लेमन ट्री हॉटेल) ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपूल तयार करता येणार नाही. अखंड उड्डाणपूल तयार झाल्यास तो शेंद्रा येथे ‘डीएमआयसी’ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा विकास तसेच ऑरिक सिटीसाठी उपयुक्त राहील. अमरप्रीत चौकात उड्डाणपूल तयार करण्यासाठी ‘एनएचएआय’चे तयार केलेले रेखाचित्र खा. जलील यांनी प्रस्तावासोबत अलोक कुमार यांच्याकडे सादर केले.