छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या छत्रपती संभाजीनगर-परभणी या १९३ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याचा ‘डीपीआर’ रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला. आता या दुहेरीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. परिणामी, रेल्वेंची संख्याही कमी आहे. नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच वर्षांनुवर्षे निघून गेली. अखेर छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले आहे. या दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पात २१४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. या दुहेरीकरणाच्या कामाचाही ‘श्रीगणेशा’ झाला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे आता लक्ष लागले आहे.
दुहेरीकरणाचा काय फायदा?मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे. दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वेंची संख्या वाढण्यास मदत होईल. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड-परभणी या एकेरी मार्गाचे विद्युतीकरण मार्गी लागले.
सर्वेक्षणातून ‘अलाईमेंट’ निश्चितछत्रपती संभाजीनगर- परभणी रेल्वेच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात ‘अलाईमेंट’ निश्चित केली जात असते. सर्वेक्षण झाले असून ‘डीपीआर’ सादर करण्यात आलेला आहे.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग, ‘दमरे’