विकास राऊत
औरंगाबाद : पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज १९ मार्च रोजी ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. कौतुकाने काही सांगावे, असा हा दिवस नाही. मात्र, या ३५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नशिबी हालअपेष्टांचे जगणे कायम आहे. मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वर्षागणिक वाढतच चालले असून घरातील कर्त्या धन्याने नापिकी, कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मजुरी, कर्जाचा ओझे घेऊन संघर्ष यातनांसह जगावे लागते आहे. सरकारच्या अनेक योजना, उपक्रम गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांने आत्महत्या करून जीवन संपविले नाही, असे ३५ वर्षांत एकही वर्ष नाही.
२००६ च्या निर्णयानुसार देण्यात येणारी १ लाखांची मदतदेखील सरकारी कारभार, चौकशा, वशिलेबाजीत अडकून पडते. १५ वर्षांत महागाईचा दर आभाळाला भिडला आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवाचे मोल १ लाखांत करून तेही वेळेत न देण्याचा तुघलकी कारभार राज्यात सुरू आहे. आत्महत्या केल्यानंतरही कर्जाचा बोजा तसाच राहतो व कुटुंबीयांना कर्जाची परतफेड करावी लागते.
गेले दोन पावसाळे जिल्ह्यात चांगले बरसले, मात्र अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. अवकाळी पावसाने गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामात व यंदा गेल्या महिन्यात रबी हंगामातील पिकांचे नुकसान केले. या सगळ्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी नैसर्गिक, आर्थिक, मानसिक खेळ शेतकऱ्यांच्या जीवावर बेततो आहे.
२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या
मराठवाड्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अंदाजे ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ११० आत्महत्यांची नोंद झाली. त्यातील ७० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. उर्वरित प्रकरणे चौकशीअंती निकाली काढल्याचा दावा करण्यात येत आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी मागील वर्षी २० प्रकरणांमध्ये चौकशी झाली.
२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या अशा
जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात सुमारे १२२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यातील ९६ प्रकरणांत शासकीय मदत देण्यात आली. ७० हजार बँकेत डिपॉझिट, तर आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना ३० हजारांची रोख मदत देण्यात आली. २६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. त्यातील १७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
२०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २६ आत्महत्या
२०२१ वर्षाच्या सुरुवातीला दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात २६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यातील निम्या प्रकरणात शासकीय मदत दिली आहे. काही प्रकरणांची अजून चौकशी झालेली नाही.
-----------------------------------------------------------
मजुरी करून उदरनिर्वाह
शेलूद येथील शेतकरी रामदास नरवडे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वतीबाई नरवडे व दोन मुले आहेत. सध्या पत्नी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा मुलगा बारावीत शिकत आहे. शासकीय मदत अद्याप मिळालेलीच नाही, शिवाय नरवडे यांचे दीड लाखांचे कर्जदेखील तसेच आहे. त्यांचा एक मुलगा मतिमंद आहे.
-----------------------------------------------------------
संघर्षासह जगण्याची वेळ
तालुक्यातील लाडसावंगी परिसरातील दीपक गवळी या शेतकऱ्याने गेल्या महिन्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी ज्योती गवळी व दोन मुलांवर संघर्षासह जगण्याची वेळ आली आहे. गवळी कुटुंबीयांना आजवर शासकीय मदत मिळालेली नाही. शेतात मजुरी करून ज्योती घर चालवत आहेत. दीपक यांनी सहकारी बँकेचे कर्ज घेतले होते.
-----------------------------------------------------------
मजुरी करण्याविना पर्याय नाही
फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील शेतकरी अशोक कडूबा काळे यांनी कर्जबाजारीपणामुळे तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी लक्ष्मी काळे व दोन मुले असून त्यांच्यासमोर मजुरी करून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नाही. एक एकर शेती असून त्यात काही भागत नाही. शासकीय मदतही आजवर मिळालेली नाही.