छत्रपती संभाजीनगर : चाळीस वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील चार वर्षे कुलगुरू पदाचा कार्यकाळ अत्यंत आव्हानात्मक व संस्मरणीय ठरला. सर्व अधिकार मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व मराठवाड्याच्या जनतेने सहकार्य केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला शैक्षणिक व आर्थिक शिस्त आणण्यास यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले केले.
कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची शेवटची बैठक गुरुवारी पार पडली. त्यात कुलगुरूंसह प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांच्या अभिनंदनाच्या ठरावास मान्यता दिली. त्यानंतर कुलगुरू बोलत होते.
बैठकीत अखेरच्या सत्रात पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. बी. एन. डोळे यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विद्यापीठाला योग्य दिशा देण्याचे काम कुलगुरूंनी केले असून, त्यांची कारकिर्द संस्मरणात राहील, असे डॉ. डोळे म्हणाले. तर प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांनी कुलगुरूंसह प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यावेळी डॉ. आघाव म्हणाले, विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकांना आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम कुलगुरूंनी केले. तसेच ‘नवीन शैक्षणिक धोरणा’ची प्रभावी अंमलबजावणी करून काही महाविद्यालयांच्या बेशिस्तीला लगाम घातल्याचेही डॉ. आघाव यांनी सांगितले.
आर्थिक शिस्तीसाठी कडक भूमिकासत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, गेल्या चार वर्षांत या विद्यापीठात अनेक दिशादर्शक निर्णय घेतले. विद्यापीठाला आर्थिक शिस्त आणण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागली. या काळात विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयावर राज्य, राष्ट्रीय पातळीवर आणि युजीसीनेही शिक्कामोर्तब केले. विद्यापीठाला नावलौकिक मिळवून देतानाच लोकांच्या भावनाही मिळवू शकलो, असेही कुलगुरू डॉ. येवले म्हणाले.