औरंगाबाद : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण, नातेवाईकांची सर्वाधिक धावपळ रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी झाली. आता म्युकरमायेकोसिस या बुरशीजन्य आजारावर नियंत्रण मिळविणाऱ्या अॅम्फटेरेसीन-बी या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी रेमडेसेविर इंजेक्शन रुग्णांना अजून दिले जात आहे. तर म्युकरमायकोसिससाठी लागणारे इंजेक्शनदेखील दररोज वितरित केले जात असल्याने याचा काळाबाजार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गठित केलेल्या समितीने पारदर्शकपणे काम केल्यामुळे या दोन्ही इंजेक्शन्सचा काळाबाजार रोखणे शक्य झाले. जेवढे इंजेक्शन उपलब्ध होत गेले, त्याचे समान वाटप खासगी आणि शासकीय रुग्णालयातून केल्यामुळे रेमडेसिविरचा तुटवडा कमी प्रमाणात जाणवला. तर अॅम्फटेरेसिन-बीचे वाटपदेखील रेमडेसिविरच्या धर्तीवरच वाटप होत असल्यामुळे कमी पुरवठा होत असला तरी रुग्णांपर्यंत इंजेक्शन देण्यात येत आहेत.
जिल्हा प्रशासनाने रेमडेसेविरचे सरासरी रोज ४०० इंजेक्शन ११३ खासगी हॉस्पिटल्सना समान वाटप करण्याचा प्रयत्न केला. एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे १५ हजार १३१ इंजेक्शन्स वाटप करण्यात आले. त्यात प्रत्येक हॉस्पिटलला फॅसिलिटी क्रमांक देण्यात आला होता. रुग्णांचा आकडा, व्हेंटिलेटरवर किती आहेत, याची खात्री करूनच इंजेक्शन देण्यात आले.
अंदाज बांधून मागणी नोंदविली
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, की नोव्हेंबर २०२० मध्येच रेमडेसिविरच्या मागणीचा आराखडा तयार केला होता. त्यानुसारच आजवर मागणी आणि पुरवठ्याचे सत्र सुरु आहे. रुग्ण, हॉस्पिटल आणि प्रशासन या त्रिसूत्रीच्या पलीकडे कुणीही मध्यस्थी यात ठेवलेली नाही. तसेच किती इंजेक्शन कुणाला दिले, याचा तक्ता रोज जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णनातेवाईकांना सर्व काही स्पष्टपणे दिसत होते.
अॅम्फोटेरेसिन-बी चा तुटवडा कमी होईल
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, अॅम्फोटेरेसिन-बी या इंजेक्शनचा तुटवडा आगामी काळात कमी होईल, असा दावा करीत ते म्हणाले, रुग्णाच्या वजनानुसार ते इंजेक्शन दिले जात आहे. एका रुग्णाला ७ इंजेक्शन किमान लागतात. म्युकरमायकोसिसचे किमान ४०० च्या आसपास रुग्णसंख्या आहे. त्यांना वेळेत इंजेक्शन मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.