लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याविषयी ‘पॅशन’असणे आवश्यक आहे. नाट्य असो की चित्रपट.. साहित्य असो की संगीत... सगळीकडेच अगदी हृदयातून असणारी आवडच कामी येते. अन्यथा यश मिळविणे कठीण असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. मंचावर कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान, आयोजन समिती सदस्य डॉ. दासू वैद्य, डॉ. संजय मोहड, डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय देवळाणकर, डॉ. संजय नवले आणि लक्ष्मीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी प्रतीक्षा लोणकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेत असताना या जागेचे महत्त्व समजले नाही. मात्र या शहरातून मुंबईत स्थलांतर केल्यानंतर या विभागाचे, शहराचे महत्त्व कळल्याचे लोणकर यांनी सांगितले. आता याठिकाणी आल्यामुळे सर्व घटनांचा फ्लॅशबॅक समोर आला. तो आयुष्याचा फ्लॅशकटच आहे. औरंगाबादेतच नाटकांची समान आवड असणारी माणसे एकत्र आली. त्यातून नावीन्यपूर्ण भूमिका केल्या. तेव्हा यश मिळाले. आता यश मिळविण्याच्या तंत्रांची मोठ्या प्रमाणात पुस्तकेही बाजारात आली आहेत. मात्र या पुस्तकांचा वापर करून मिळणा-या यशाचा दर्जा ओळखला पाहिजे, असा सल्लाही लोणकर यांनी दिला.शिक्षण घेतलेल्या ठिकाणीच युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावणे हा खरा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील युवकांना युवक महोत्सव हे महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होते. याठिकाणी सर्वांनी कला सादर करावी. बक्षिसे कोणालाही मिळतील. मात्र सर्वच विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेण्याचे आवाहन डॉ. चोपडे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. मुस्तजिब खान यांनी आयोजनाची माहिती दिली. यावेळी नुकतेच निधन पावलेले डॉ.रुस्तुम अचलखांब, डॉ. किशन ढाबे, जमील आणि स्वातंत्र्यसैनिक लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे यांनी आभार मानले.
‘पॅशन’शिवाय यश अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:21 AM