औरंगाबाद : जळगाव येथे नुकत्याच झालेल्या दुसऱ्या खान्देश जलतरण स्पर्धेत आईवडिलांसह मुलाने पदक जिंकण्याची किमया साधली. यात मदन बाशा यांनी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. मीरा बाशा यांनी डबल गोल्डन धमाका केला, तर व्रज बाशा याने कांस्यपदकाची कमाई केली.
मदन बाशा यांनी ५० ते ५४ वयोगटात ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर त्यांनी ५० मीटर बटरफ्लाय आणि ५० मी. फ्री स्टाईल यामध्येही डबल गोल्डन धमाका केला. त्यांची पत्नी मीरा बाशा यांनी महिलांच्या ५० ते ५४ वयोगटात ५० मीटर ब्रेस्ट स्ट्राकमध्ये आणि ५० मी. बॅक स्ट्राक या दोन्ही प्रकारात एकूण दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांचा मुलगा व्रज बाशा याने १७ वर्षांखालील गटात ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
उल्लेखनीय बाब म्हणजे मदन बाशा आणि मीरा बाशा यांनी याआधी अनेक मास्टर्स स्पर्धेत पदकांची लूट केली आहे. औरंगाबाद येथे गत महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत मदन बाशा यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटात २०० मी. आयएममध्ये सुवर्ण, ५० मी. बॅक स्ट्रोक आणि ५० मी. बटरफ्लाय या दोन्ही प्रकारात रौप्य अशा एकूण ३ पदकांची कमाई केली होती. तसेच मीरा बाशा यांनी १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक, ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात एकूण दोन तर ५० मी. बॅक स्ट्रोक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.