औरंगाबाद : वार बुधवार... वेळ रात्री १०.३० ची... हर्सूलच्या भगतसिंगनगरलगतच्या मैदानावर हजारो हर्सूलकर एकत्रित आलेले. ‘शुभमंगल सावधान’ असे मंगलाष्टक झाले... टाळ्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी झाली आणि अनाथ गौरीचे लग्न थाटामाटात लागले. गौरीचे भाग्य उजळले, असे म्हणत उपस्थित शेकडो महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
हरसिद्धी माता यात्रोत्सव व अनिता औताडे यांच्या स्मरणार्थ उपमहापौर विजय औताडे यांनी गौरीचे कन्यादान केले. औताडे यांच्या १७ अनाथ दत्तक कन्यांमधील भगवान बाबा बालिका आश्रमामधील गौरी ही एक. तिचा विवाह बुधवारी अमित सोनवणे या युवकाशी लावण्यात आला. तिच्या या लग्नाचे साक्षीदार ठरले ते महापौर नंदकुमार घोडले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे. या समारंभाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे वºहाडी म्हणून उपस्थित होते. भव्य मैदान वºहाडींनी भरून गेले होते.
आजूबाजूच्या अपार्टमेंटवरही अनेक वºहाडी उभे होते. ‘वाजती चौघडा... टाका अक्षता प्रेमाने... शुभ मंगल सावधान...’ असे मंगलाष्टक संपताच हजारो वºहाडींनी अक्षतारूपी आशीर्वाद देत टाळ्यांचा कडकडाट केला अन् अर्पाटमेंटवरून फटाक्यांची आतषबाजी झाली. ‘आता गौरी अनाथ राहिली नाही, अमितच्या रूपाने नाथ मिळाला, पोरीचे भाग्य उजळले,’ असे अनेक महिला पुटपुटत होत्या. आपल्याच पोटच्या मुलीचे लग्न लागले, अशीच भावना त्यांची होती. ‘अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे लग्न लावून देऊन विजय औताडे यांनी समाजासमोरच नव्हे, तर राजकारण्यांसमोर एक आदर्श निर्माण केल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. या भव्य सोहळ्याचे कौतुक हरिभाऊ बागडे यांनी केले.
समाजाचे देणे लागतो या भावनेतून मी १७ अनाथ मुलींना दत्तक घेतले व त्यातील पहिल्या मुलीचे लग्न लावले. ही प्रेरणा माझी आई व वडिलांकडून मिळाली, अशा शब्दांत विजय औताडे यांनी आपली भावना व्यक्त केली. तत्पूर्वी, भरत गणेशपुरे यांनी विनोदी स्कीट सादर करून सर्वांना हसविले व सोनाली कुलकर्णीने ‘आई’ या गीतावर नृत्य करून सर्वांची मने जिंकली. गायक राजेश सरकटे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे खड्या आवाजातील गीत सादर करून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. सूत्रसंचालक समाधन इंगळे यांनी विविध किस्से सांगून रंगत आणली.
हे सर्व स्वप्नवतच -गौरी लग्न लागल्यानंतर गौरी म्हणाली की, हे सर्व स्वप्नवतच. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, माझे लग्न एवढ्या मोठ्या मंडपात होईल. एवढे मान्यवर व हजारो वºहाडी माझ्या लग्नाला येतील. आता मी अनाथ नाही. मलाही हक्काचे कुटुंब मिळाले आहे, असे सांगताना तिने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.