- संतोष हिरेमठऔरंगाबाद : आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींसाठी ऑफर ऐकल्या असतील; पण वाहन परवान्यासाठीही (लायसन्स) ऑफर दिली जात आहे. हो, वाहन परवान्यासाठीच. व्हाॅट्सॲपवर कागदपत्रे पाठवा आणि लर्निंग लायसन्स मिळवा, अवघ्या ८०० रुपयांत, तेही अवघ्या १० मिनिटांत; पण ही ऑफर आरटीओ कार्यालयाची नसून एजंटाची आहे, बरं. या धक्कादायक प्रकाराने कोणाच्याही हातात अगदी सहजपणे लायसन्स पडण्याची आणि त्यातून गैरप्रकार होण्याची भीती नाकारता येत नाही; पण या प्रकारापासून परिवहन विभाग आणि आरटीओ कार्यालय अनभिज्ञ आहे.
राज्यभरात १४ जूनपासून ऑनलाइन चाचणी आणि लर्निंग लायसन्स देण्यास सुरुवात झाली. नव्या सुविधेमुळे आरटीओ कार्यालयात जाऊन लर्निंग लायसन्स काढण्याच्या कटकटीपासून उमेदवारांची सुटका झाली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की, प्रत्येक जण वाहन चालविण्याचा परवाना काढण्याकडे ओढा असतो. याचाच फायदा घेऊन परवाने वाटण्याचा उद्योगच काहींनी सुरू केला आहे. व्हॉट्सॲपवर कागदपत्रे पाठवून राज्यात कुठूनही वाहन परवाना काढण्याची सामाजिक माध्यमातून ऑफर देणाऱ्या संबंधित व्यक्तीशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला. तेव्हा अगदी सहजपणे लायसन्स मिळेल, अशी खात्रीच देण्यात आली.
काय आहे ऑफर ?खुशखबर, खुशखबर, खुशखबर, संडे स्पेशल ऑफर. दुचाकी, चारचाकी लर्निंग लायसन्स ऑल महाराष्ट्र फक्त ८०० रुपये, फक्त १० मिनिटांत काढून मिळेल. डाॅक्युमेंट व्हाॅट्सॲप करा आणि लर्निंग लायसन्सची पीडीएफ व्हाॅट्सॲपला मिळवा. लागणारी कागदपत्रे, आधार कार्ड आणि सही... अशी ही ऑफर देण्यात आली आहे.
कारवाई केली जाईललर्निंग लायसन्सबाबीत काही गैरप्रकार होत असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सुविधेसाठी लर्निंग लायसन्सची चाचणी ऑनलाईन सुरू झालेली आहे. ही चाचणी स्वत: शिकाऊ चालकांनी दिली पाहिजे. नागरिकांनीही यासंदर्भात आमच्याकडे तक्रार केली पाहिजे.- विजय काठोळे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी
संबंधित ऑफर देणाऱ्या व्यक्तीशी मोबाईलवरील संवादप्रतिनिधी : सर, लर्निंग काढायचे आहे.व्यक्ती : या नंबरवर कागदपत्रे पाठवा.प्रतिनिधी : कधी मिळेल लायसन्स?व्यक्ती : अर्ध्या, एक तासात मिळेल.प्रतिनिधी : पैसे कसे पाठवायचे?व्यक्ती : या मोबाईल नंबरवर पाठवा.