नागद : बेलखेडा शिवारात असलेले शेतकरी कुंजीलाल ईश्वर चव्हाण यांच्या पोल्टीफार्ममधील दोनशे कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच कुक्कुटपालन सुरू केले होते. मात्र, अचानक
झालेल्या या घटनेने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बर्ड फ्लूच्या भीतीने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री शेतकरी कुंजीलाल चव्हाण हे नेहमीप्रमाणे शेतशिवारात गेले. पोल्टीफार्ममधील सर्व कोंबड्यांना त्यांनी चारापाणी केला. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतावर जाऊन पाहतात. तर त्यांना अडीचशे पैकी जवळपास दोनशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. हे चित्र पाहून ते अचानकपणे घाबरून गेले. त्यांनी मित्र, नातेवाइकांना ही माहिती कळविली. त्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने गावातील लोक जमा झाले होते.
पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांना सदरील घटनेची माहिती देण्यात आली. नागद येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. एम. एस. सुरसुंद्रे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. त्यांनी वरिष्ठ कार्यालयास भेट दिली. दुपारी तीन वाजता पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉ. सुरेखा माने यांच्यासह डॉ. आर. डी. इंगळे (पशुधन विकास अधिकारी, कन्नड), डॉ. पी. वाय. चौधरी, ग्रामसेवक श्रीकांत पाटील, डॉ. गांधिले, डॉ. नीळकंठ वार, डॉ. सुसुंद्रे यांनी भेट दिली. मृत झालेल्या कोंबड्यांपैकी पाच कोंबड्या उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात येतील. तेथून भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. संबंधित घटनेचा पंचनामा करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येईल, असे डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.
फोटो : मृत कोंबड्या.