वैजापूर : तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दोन दिवसात सादर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता वैजापुरात पाहणी केली. काही तासांच्या या पाहणीत त्यांनी विनामास्क असलेल्या दोन जणांवर कारवाई केली.
शहरातील आंबेडकर चौकात त्यांनी वाहनांचा ताफा थांबविला. तेथून उपजिल्हा रुग्णालयाकडे पायी जाताना त्यांनी मास्क न लावणाऱ्या आइस्क्रीम विक्रेता तसेच मेडिकल चालक अशा दोन जणांना प्रत्येकी दोन हजाराचा दंड लावण्याची कारवाई केली. या कारवाईने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. यावेळी सीईओ मंगेश गोंदवले, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, बीडीओ ज्ञानोबा मोकाटे, न.प. सीईओ बी.यु. बिघोत यांच्या अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रारी
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट देऊन सेंटरमधील आढावा घेतला. कर्मचाऱ्यांनी नाक-कान-घसा तज्ज्ञ, डाटा ऑपरेटर, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी केली. पालिकेच्या सीईओंना स्वच्छता तसेच उपविभागीय अधिकारी आहेर यांना काॅल बेसवर रुग्णवाहिका सुरू करा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.