छत्रपती संभाजीनगर: शहराच्या आकाशात बुधवारी सायंकाळी हेलिकॉप्टरने पाच ते सहा वेळा फेऱ्या मारल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. विशेष म्हणजे, हे हेलिकॉप्टर प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सायंकाळनंतर अचानक हेलिकॉप्टरने शहराच्या मध्यभागी आणि प्रमुख भागांवरून फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. सिडको, गारखेडा, नारेगाव, उस्मानपुरा आदी नागरिकांनी उत्सुकतेने आकाशाकडे पाहत या दृश्याचा आनंद घेतला. काहींना प्रथमदर्शनी हे एखाद्या आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित असल्याचा अंदाज वाटला, परंतु प्रत्यक्षात हे एक नियमित प्रशिक्षण उड्डाण असल्याचे स्पष्ट झाले. प्राप्त माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर शिक्षणार्थींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी ते वापरले जाते. या हेलिकॉप्टरने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ठराविक अंतरावर फेऱ्या मारून प्रशिक्षणार्थींना विविध परिस्थितींमध्ये उड्डाणाची तयारी शिकवण्यात आली.
सायंकाळनंतर हेलिकॉप्टरच्या छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात घिरट्या; नागरिकांमध्ये उत्सुकता
By संतोष हिरेमठ | Updated: January 15, 2025 20:12 IST