औरंगाबाद: नाशिक- हिंगोली या बसला आज पहाटे १ वाजेच्या सुमारास ढोरेगाव येथे अचानक आग लागली. यात संपूर्ण बस (क्र. mh 14-bt 3805) जळून खाक झाली असून २६ प्रवासी बालंबाल बचावले आहेत.
नाशिकच्या आगार क्रंमाक १ मधून रविवारी रात्री नाशिक-हिंगोली ही बस रवाना झाली होती. पहाटे १ वाजेच्या दरम्यान गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे बस आली असता इंजिनमधून धूर निघू लागला. चालक आर .डी. लोखंडे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ बस थांबवली. वाहक एम. पी. नरोळे यांना याची माहिती देत दोघांनी बसमधील २६ प्रवास्यांना खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरून सुरक्षितस्थळी थांबले. याचवेळी संपूर्ण बस आगीने वेढली गेली.
आगीची माहिती मिळताच काही वेळात अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी काही वेळात आगी विझवली. दैवबलवत्तर म्हणून चालक-वाहकासह २६ प्रवासी सुखरूप आहेत. आगीची माहिती मिळाल्यानंतर विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच आगार प्रमुख औरंगाबाद 2 हे घटनास्थळी असून आगीची माहिती घेत आहेत.