औरंगाबाद : हवामान बदल व हवामान न्याय या विषयावर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट (आयओइडी) या संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय डिजिटल परिषदेचे उद्घाटन माल्दवाचे माजी पंतप्रधान चिरील गाबुरीसी यांच्या हस्ते करण्यात आले. हवामान न्याय या विषयावरील एकदिवसीय परिषदेच्या अंतिम सत्रात माजी कुलगुरू व माध्यमतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना आंतरराष्ट्रीय हवामान रक्षक हा पुरस्कार घोषित करण्यात आला. अध्यक्षस्थानी आयओइडीचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार शर्मा हे होते.
माल्दवाचे माजी पंतप्रधान चिरील गाबुरीसी यांनाही हा पुरस्कार दिला गेला. प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परिसर विकास समितीचे अध्यक्ष म्हणून २०० हून अधिक एकर पडीक जमिनीवर जिरायत फळबाग प्रकल्प संकल्पना करून तो प्रत्यक्षात राबवून दाखविला आहे. विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या अभ्यासक्रमात पदव्युत्तर स्तरावर भारतात प्रथमच शाश्वत विकास संवाद व पर्यावरण संवाद हे विषय सुरू केलेले होते. तसेच सोलार प्लँट व जलसंधारण योजना राबविली होती. याशिवाय प्रा. सुधीर गव्हाणे यांनी पर्यावरण व हवामान बदल, रिसायकलिंग उद्योग, ग्रीन टेक्नोलॉजी, आदींवर सातत्याने केलेल्या लेखनाचीही नोंद घेतली गेली. संयुक्त राष्ट्र संघाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स व मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ग्लोबल ग्रीन ग्रोथ वर अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. या सर्व कार्याची नोंद घेऊन हा हवामान रक्षक पुरस्कार दिला गेला आहे.