वाळूज महानगर : मुलबाळ नसल्याने पोटचं मुल म्हणून सांभाळ केलेल्या मानलेल्या मुलाकडून व त्याच्या पत्नीकडून वृद्धेचा घर नावावर करुन घेण्यासाठी छळ केला जात आहे. सुनेने शनिवारी किरकोळ कारणावरुन जबर मारहाण केल्याचे सासू सुनंदा सोपान पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सुनंदा सोपान पाटील (६५) या वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात वास्तव्यास असून, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांचे पती मुंबई येथे बांधकाम ठेकेदार होते. त्यावेळी संजू जाधव हा त्यांच्याकडे मजूर म्हणून कामाला होता. पाटील दाम्पत्यास मूलबाळ नसल्याने त्यांनी संजू याचा मुलासारखा सांभाळ केला. काही काळानंतर पाटील दाम्पत्य औरंगाबादेत रहावयास आले. संजूही त्यांच्यासोबत आला.
पाटील कुटुंबियांनी संजूचे लग्न लावून दिले. दरम्यान, सुनंदा यांच्या पतीच्या निधनानंतर संजू व त्याची पत्नी मीरा यांनी घर नावावर करुन दे म्हणून सुनंदा यांच्याकडे तगादा लावला. मात्र, त्यांनी यास नकार दिला. त्यावरुन त्यांचा छळ केला जात होता.
दरम्यान, शनिवारी सकाळी किरकोळ कारणावरुन मीराने त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर ओळखीचा अमोल काकडे याने त्यांना रंगा भवर यांच्या घरी सोडले. भवर यांनी सुनंदा यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.