औरंगाबाद : दिवाळी म्हणजे फराळ आणि फटाके आलेच. फराळ म्हटले की, सुगरणींची धावपळ होणारच. या धावपळीत सखींनी तयार केलेल्या पदार्थांची चव काही निराळीच. रेडिमेड फराळ विकत मिळत असला तरीही त्यात मायेचा आस्वाद नाही. तशी चव हाताला असलेल्या सुगरणींच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी लोकमत सखी मंचतर्फे दिवाळी फराळ २०१४ चे आयोजन करण्यात आले होते.या फराळ स्पर्धेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खमंग व पौष्टिक पदार्थ सुगरणींनी सादर केले. कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रमाण निश्चित वापरल्यास पदार्थ हा उत्तम बनतो हे सुगरणींनी दाखवून दिले. स्पर्धेचे दोन गटांत विभाजन करण्यात आले होते. एक गोड, दुसरे तिखट पदार्थ. गोड पदार्थात बेसन लाडू, पौष्टिक ओळीव व ओटस करंजी, नवरत्न लाडू, काजू कतली, इंदोरी मख्खनवडा, खुमरी, खाजा, लवंगलतिका या पदार्थांची सजावट करून उत्कृष्ट मांडणी महिलांनी केली. तिखट पदार्थांमध्ये चकलीचे विविध प्रकार, शेवेचे प्रकार, शंकरपाळे, फरसपुरी यांसारखे अनेक खमंग चविष्ट व कुरकुरीत पदार्थ तयार करून महिलांनी आणले. या पदार्थांनी उपस्थितांच्या तोंडाला पाणी सुटले. घरी होणारी चकली ही नावीन्यपूर्ण कशी बनवता येईल याकडे महिलांचा कल दिसला. या दोन्हीपैकी एकाच चवीचा पदार्थ सुगरणींना घरी तयार करायचा होता. त्याची रेसिपीही लिहून आणायची होती. पदार्थाची सजावट मात्र स्पर्धेच्या ठिकाणी करायची होती. दोन्ही गटांतून प्रत्येकी तीन विजेते जाहीर करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून उत्तेजनार्थ बक्षिसांचे वितरण करण्याचे ठरले. स्पर्धेचे प्रायोजकत्व आरजू ज्वेलर्सने स्वीकारले होते. सखी मंचच्या सचिव अनिता कोटगिरे उपस्थित होत्या. या स्पर्धेचे परीक्षण सुवर्णा राका व ममता करवा यांनी केले. हा खमंग दिवाळी फराळाचा मेळावा लोकमत भवन येथे भरला.विजेत्यांची नावे
सुगरणींच्या पाक कौशल्याचा सखींनी घेतला आस्वाद
By admin | Published: October 21, 2014 12:53 AM