औरंगाबाद / जालना : अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) पथकांनी औरंगाबादेतील दोन उद्योगपतींच्या ७ आस्थापनांवर छापेमारी केली. ही छापेमारी रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी ईडीकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
शहराच्या मध्यवस्तीतील अदालत रोडवरील उद्योग, बांधकाम, बियाणे आणि शिक्षण संस्थांशी संबंधित असलेल्या दोन उद्योगपतींच्या समोरासमोर असलेल्या कार्यालयातील ईडीच्या पथकांनी गुरुवारी (दि. ११) दुपारी १२.१० वाजता छापा मारला. त्याच वेळी या उद्योगपतींच्या चितेगाव, बिडकीनसह शहरातील इतर कार्यालये, घरांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. एकूण सात आस्थापनांवर ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. यासाठी ईडीचे ५४ अधिकारी कार्यवाहीत सहभागी झाले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालल्याचे समजते.
जालन्यातही तपासणी ईडीच्या एका पथकाने जालना येथील जालना सहकारी साखर कारखाना, रामनगर येथे भेट देत पाहणी केली. तसेच स्थानिक लोकांकडून माहिती जाणून घेतली.