कायगाव ( औरंगाबाद ) : औरंगाबाद - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील कायगाव येथे आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान उसाचा ट्रक आणि कंटेनरचा अपघात होऊन रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटला. त्यामुळे सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला (Aurangabad-Nagar highway blocked for three hours) . चार पोकलेंड आणि जेसीबीच्या साह्याने पलटी झालेला ट्रक आणि कंटेनर बाजूला करण्यात आले. त्यानंतर सकाळी ६ वाजेपासून बंद असलेली वाहतूक सकाळी ९ वाजता सुरळीत झाली.
गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास संगमनेरकडे जाणारा उसाचा ट्रक (एमएच-२०-एए-८८०१) आणि पुण्याहून औरंगाबादकडे जाणारा कंटेनर ( एनएल- ०१-एबी-०५५७) या वाहनांचा जोरदार अपघात झाला. यावेळी उसाचा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. तर त्यातील उसाचे टिपरे रस्त्यावर पांगली. त्यातच सध्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या एकाबाजूने गॅस लाईनचे काम सुरू असल्याने घटनास्थळी खोल नाली आणि मातीचे ढिगार पडलेले आहे. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावर आडवा पडून, त्यातील ऊस रस्त्यावर पांगल्याने आणि मातीच्या ढिगारांनी वाहतुकीस अडथळे केल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक तीन तास ठप्प झाली. पर्यायी मार्ग म्हणून पोलिसांनी भेंडाळा फाटा- गंगापूर- जुने कायगाव मार्गे वाहतूक वळविली. सुमारे तीन तास वाहतुकीला लांबचा फेरा मारावा लागला.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. जेसीबीच्या आणि पोकलेंडच्या मदतीने ९ वाजेच्या सुमारास पलटी झालेला ट्रक सरळ करण्यात आला. रस्त्यावर पांगलेले ऊस बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.