औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनबाबत सूचना आलेली आहे. आरोग्य विभागासह मुंख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबईत गेल्यावर काही तासांमध्ये किंवा नंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पालकमंत्री देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन केलेले आहे; परंतु आरोग्य विभागाच्या माहितीनुसार परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पाऊल उचला, अशा सूचना आहेत. नांदेड, परभणी, बीडमध्ये लॉकडाऊन केलेले आहे. औरंगाबादमध्ये रोज दीड हजार रुग्ण सापडत आहेत. पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण रोज सापडत असताना लॉकडाऊनबाबत निर्णय होत नाही. यावर देसाई म्हणाले, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, ही सर्वांची इच्छा आहे. लॉकडाऊन केल्यानंतर जनतेला त्रास होऊ नये. कितीही वेळा लॉकडाऊन केले तर त्यातून काही उपयोग होईल का, असा प्रश्न आहे.
रुग्णवाढीचा वेग वाढतो आहे. ४ एप्रिल हा एक टप्पा आरोग्य विभागाने दाखविला आहे. त्यावेळी आताच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त वाढत गेली तर ते अडचणीचे ठरू शकेल. त्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा. अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत. औरंगाबाद, मराठवाड्यात फारसे उद्योग आलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे आणखी परिणाम होईल. यावर देसाई म्हणाले, प्राधान्य आरोग्याला दिले जाईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. तत्पूर्वी जनतेचे जीवन सुरक्षित करण्याला पर्याय नाही. लॉकडाऊनबाबत प्रशासनात मतभेद आहेत काय, औरंगाबादची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. काय निर्णय होणार, तुमच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उल्लंघन करून जल्लोष करीत आहेत. यावर काहीही उत्तर न देता पालकमंत्र्यांनी साडेदहा मिनिटांत पत्रकार परिषद सोडली.
चौकट..
लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झालेली चर्चा अशी
बैठकीत आ. अंबादास दानवे यांनी आगामी होळी आणि रंगपंचमी गर्दी करून साजरी न करण्याबाबत तसेच जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे यावर बंदी घालण्याबाबत सूचना केली. जर रुग्ण वाढत असतील लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊनची तारीख अद्याप ठरलेली नाही. ४ एप्रिलपूर्वीच लॉकडाऊनबाबत निर्णय होईल. जिल्ह्यातील वस्तुस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडल्याचे आ. दानवे म्हणाले.
आ. प्रदीप जैस्वाल यांनी रुग्णालये नसलेल्या आवारातील मेडिकल दुकाने बंद करण्याबाबत सूचना पालकमंत्र्यांकडे केली. आ. सतीश चव्हाण यांनी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात उपलब्ध बेडची माहिती देण्याबाबत सूचना केली. त्याचप्रमाणे जर लॉकडाऊनचा पर्याय निवडला तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी शिवभोजन थाळीचा पर्याय उपलब्ध ठेवावा, असेही चव्हाण म्हणाले.
लोकप्रतिनिधींच्या कोरोनाबाबत आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या, विविध रुग्णालयांत उपलब्ध असलेली बेडची संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती प्रशासनाने दिली.