पैठण : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बिडकीन येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याची सूचना उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांनी आरोग्य विभागास केली. कोविड सेंटरमधील रुग्णांची सर्वतोपरी काळजी घ्या, यापुढे रुग्णांच्या तक्रारी प्रशासन गांभीर्याने घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार दत्ता निलावाड यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात कोरोना लसीकरण व सर्वेक्षणसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, तसेच पाच कोरोना केअर सेंटरवरील सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मोरे म्हणाले की, शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांनी कार्यरत राहावे, रुग्णांची कोणती तक्रार येता कामा नये, गटविकास अधिकारी यांनी ग्रामदक्षता समिती कार्यान्वित करून बाजार भरणार नाही याची दक्षता घ्यावी. जास्त रुग्ण असलेल्या गावास स्वतः भेट देऊन कंटेन्मेंट झोन तयार करावे. सर्व कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे. विनामास्क कोणी फिरणार नाही याची दक्षता घ्यावी, आदी सूचना करण्यात त्यांनी दिल्या.
बैठकीसाठी प्रपाठक डॉ. भारत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे, गटविकास अधिकारी काळू बागुल, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तालुका आरोग्याधिकारी मणियार, जिल्हा नोडल अधिकारी विजय वाघ यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.