औरंगाबाद : बेरोजगारीमुळे दारूचे व्यसन लागलेल्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर बसलेल्या वृद्धेला वाचविण्यात सामाजिक कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी यश आले. ही घटना संग्रामनगर रेल्वे रूळ परिसरात घडली.सुलभा लक्ष्मीकांत कुलकर्णी (५५, रा. सातारा परिसर), असे या महिलेचे नाव आहे. सुलभा यांचे पती खाजगी नोकरीनिमित्त नांदेड येथे राहतात. त्यांना दोन मुले आहेत. खाजगी नोकरी गेल्याने त्यांचा मोठा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार आहे. पतीकडून मिळणाºया पैशातून सुलभा घर चालवितात.
त्यांच्या मोठ्या मुलाला दारूचे व्यसन जडले आहे. दारूच्या नशेत तो सुलभा यांच्यासह घरातील अन्य सदस्यांना सतत शिवीगाळ आणि मारहाण करतो. दारूसाठी पैसे मागतो. चार दिवसांपूर्वी त्याने घरात लाकडी दांडा आणून ठेवला असून, तो आईला जिवे मारण्याची धमकी देत असतो. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या सुलभा यांनी मुलाच्या हातून मरण्यापेक्षा आपण आत्महत्या करावी, असा विचार करून त्या सोमवारी सकाळी थेट संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर येऊन बसल्या. सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील, सुरेश दाभाडे, कैलास भातपुडे, शिवानंद वाडकर यांनी तेथे धाव घेऊन त्यांना रेल्वे रुळावरून उठण्याची विनंती केली. मला जगायचे नाही, असे म्हणून त्या रेल्वेचा सेफ्टी खांब घट्ट पकडून बसल्या. शेवटी गोर्डे पाटील यांनी नंदा सोंजे, नेत्रा जोशी, मीना कीर्तीकर, पद्मा तोंबडकर यांना बोलावले. या महिलांनी त्यांना रुळावरून उठण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्या ऐकत नव्हत्या. त्याचवेळी रेल्वे इंजिन येत असल्याचे त्यांना दिसले. इंजिन २०० मीटरवर आले तरी सुलभा रुळावरून उठत नसल्याने शेवटी महिलांनी त्यांना बळजबरीने उचलून बाजूला केले. त्यांनी मुलगा जिवे मारण्याची धमकी देतो आणि घरातील वातावरण खराब झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले.
नातेवाईकांना बोलावलेसातारा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. तेथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना जेवायला दिल्यानंतर सातारा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी सुलभा यांचा मुलगा, सून आणि अन्य नातेवाईकांना बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, सपोनि सुनील कराळे, कर्मचारी कारभारी नलावडे यांनी मुलाला समजावून सांगितल्यानंतर आईला सन्मानाची वागणूक देण्याच्या हमीवर त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.