आकाश दत्तराव अडकीने (वय २२, रा. अग्रसेन भवनजवळ, सिडको एन ५ ) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. आकाशला शासकीय अधिकारी व्हायचे होते. यामुळे अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याने थेट स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. शहरातील सिडको एन ५ मधील अग्रसेन भवनजवळील बंगल्यात तो डॉक्टरभाऊ आणि भावजय यांच्यासह राहत होता. बुधवारी त्याचा भाऊ आणि भावजाय कामानिमित्त मुंबईला गेले होते. यामुळे आकाश घरी एकटाच होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा भाऊ आणि भावजय मुंबईहून घरी परतले, तेव्हा आकाश त्याच्या खोलीत झोपलेला होता. त्यामुळे त्याला न उठविता ते स्वतःच्या खोलीत जाऊन झोपले.
रोज सकाळी ६ वाजता आकाश अभ्यासिकेत जात असतो. आज तो उठला नाही, त्यामुळे त्याला उठविण्यासाठी भाऊ त्याच्या खोलीत गेला असता, आकाशने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी लगेच सिडको पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आकाशला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हवालदार पठाण तपास करीत आहेत.
कोविडमुळे वर्षभर स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. परीक्षा लांबल्यामुळे आकाशने नैराश्येतून आत्महत्या केली असावी , असा प्राथमिक अंदाज त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी वर्तविल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.