लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पदमपुरा येथील खाजगी वसतिगृहात राहणाºया अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समोर आले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून समजले. घटनास्थळी पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली असून, या चिठ्ठीतील माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. ही घटना शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.ऐश्वर्या बालाजी मुंडकर (वय २०, रा. पारिजात कॉलनी, सेलू, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, ऐश्वर्या ही बजाजनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. द्वितीय वर्षात शिकत होती. ती पदमपुरा येथील सिद्धिविनायक वसतिगृहात राहत होती. आज दुपारी चार ते सव्वाचार वाजेच्या सुमारास ती बाहेरून वसतिगृहात आली आणि तिने रूमची खोली आतून बंद करून घेतली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्या रूमपार्टनर रूमवर गेल्या तेव्हा त्यांना रूमचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावल्यानंतरही ऐश्वर्याने दार न उघडल्याने मुलींनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता ऐश्वर्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ वेदांतनगर पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे, पोलीस उपनिरीक्षक कोपनर, पोलीस उपनिरीक्षक आजले आदींनी ऐश्वर्याचा मृतदेह घाटीत दाखल केला. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हेदेखील घाटीत धावले व तपासासंदर्भात सूचना केल्या. वेदांतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:05 AM