दिलीप रामकिसन गवळी(४०)असे मृताचे नाव आहे. दिलीप हे नक्षत्रवाडी येथे आई वडिलांसोबत राहात होते. तर त्यांची पोलीस पत्नी माहेरी नक्षत्रपार्कमध्ये राहात. त्यांना १४ वर्षे आणि १० वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. दिलीप हे किराणा दुकान चालवित होते. मात्र, लॉकडाऊनपासून त्यांचे दुकान बंद पडले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. ही बाब मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास नातेवाइकांना दिसताच त्यांचा भाऊ सचिन गवळी आणि सासऱ्यानी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून पहाटे ३:३० वाजता मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शनिवारी सकाळी घाटीत त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाइकानी आमची तक्रार असल्याचे सांगून गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी आधी अंत्यसंस्कार करून घ्या. तुम्हाला कधीही तक्रार करता येईल, असे पोलिसांनी त्यांना सांगून समजूत काढली. यानंतर प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी नेले. पोलीस हवालदार लक्ष्मण इथापे तपास करीत आहेत. दिलीप यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.
महिला पोलिसाच्या पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:03 AM