करमाड : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने आर्थिक लुबाडणूक केल्याने नैराश्यातून एका विवाहित तरुणाने किरण जळगाव येथील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. ९) दुपारी उघडकीस आली. शरद उत्तमराव शेळके (३४) असे मृत तरुणाचे नाव असून तो विष्णूनगर येथे राहत असे. या प्रकरणी शरदच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी तरुणी व तिच्या दुसऱ्या प्रियकरास अटक केली आहे.
औरंगाबाद तालुक्यातील जळगाव फेरण शिवारात दि.9 एप्रिल रोजी दुपारी शरद शेळके या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गावातील तरुणांच्या मदतीने शरदला बाहेर काढून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, शरदने लिहिलेली आठ ते दहा पानांची एक सुसाईड नोट करमाड पोलिसांना मिळाली. सुसाईड नोटमध्ये शरदने त्याच्या 21 वर्षीय अविवाहित प्रेयसी व तिच्या दुसऱ्या प्रियकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी प्रेमिका आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले आहेत. तिचा प्रियकर अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळात दोषारोप दाखल करणार असल्याचे करमाड पोलिसांनी सांगितले आहे.
आर्थिक लुबाडणूक करून दिली जीवे मारण्याची धमकीसुसाईड नोटनुसार, साक्षी (नाव बदलेले आहे) ही तरुणी शरदच्या घरासमोर राहते. तिने शरदसह अनेकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे. साक्षीचे २०२० पासून शरद सोबत प्रेमसंबंध होते. तिने विविध कारणे सांगून त्याच्याकडून जवळपास नऊ ते दहा लाख रुपये उकळलेले. यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. पुढे शरदने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर साक्षीने त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ३ जानेवारीस साक्षीने कॉल करून शरदला आपले प्रेम संबंध संपले आहेत. माझे दुसऱ्या एकावर प्रेम आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे. माझे ऐकले नाही तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. तिच्यामुळे माझे दोन्ही मुलं उघड्यावर पडली. तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत तिच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असे ही सुसाईड नोट आढळून आले. त्याच्या पश्चात आई -वडील, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री कैलास नगर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.