औरंगाबाद : प्रा. राजन शिंदे यांची हत्या ( Dr. Rajan Shinde Murder Case:) करणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने सुरुवातीला तुम्ही सारखी सारखी चौकशी केल्यास आत्महत्या करून सुसाइड नोटमध्ये ( Suicide Note ) तुमची नावे लिहून ठेवीन, अशी धमकी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी अगोदर सबळ पुरावे गोळा करायचे आणि नंतरच त्याची चौकशी करायची, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रा. राजन शिंदे (रा. सिडको एन-२) यांची ११ ऑक्टोबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्याच निकटवर्तीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने केल्याचा पोलिसांना सुरुवातीपासून अंदाज आला होता. त्यानंतर अलीकडे त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेले शस्त्र आणि वस्तू विहिरीत टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी या वस्तू जप्त केल्यावर सोमवारी त्याला ताब्यात घेतले आणि बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत संयम ठेवून या संवेदनशील हत्येचा उलगडा केला.
घटनेच्या पहिल्या दिवसापासून हा मारेकरी पोलिसांचा मुख्य संशयित होता. यामुळे घटनेनंतर काही तासांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने तुमच्याकडे काय पुरावा आहे. मी अल्पवयीन आहे. तुम्ही अशी चौकशी करू शकत नाही, असे बजावले होते. पोलिसांनी त्याची समजूत काढत केवळ विचारपूस करत असल्याचे सांगितले. मात्र, तुम्ही जर सारखी माझी चौकशी कराल, तर तुमच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीत तुमची नावे लिहून ठेवीन, अशी धमकी दिली होती. तेव्हा पोलिसांनी अगोदर पुरावे जमा करायचे ठरवले. प्रा. शिंदे आणि या विधिसंघर्षग्रस्त बालकामध्ये कधी अभ्यास, तर कधी लहान-मोठ्या कारणांवरून सतत खटके उडायचे. यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे नातेवाइकांना समजले. मग, नातेवाइकांनीही पोलिसांना खरे काय ते सांगण्यासाठी त्या बालकावर दबाव टाकला. तेव्हा कुठे त्याने पोलिसांसमोर तोंड उघडले.