औरंगाबाद : सिडकोतील शिवछत्रपती कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या रोमिओंना पोलीस आयुक्तालयातील दामिनी पथकाने सलग दोन दिवस कारवाई करून चांगलाच धडा शिकविला. यावेळी एका टवाळखोराने कारवाई टाळण्यासाठी चक्क दामिनी पथकाला आत्महत्येची धमकी दिल्याचे समोर आले.
सिडको एन-३ मधील शिवछत्रपती कॉलेज, एक विधि महाविद्यालय आणि दोन शाळा आहेत. तेथील तरुणींचा पाठलाग करणे, त्यांची छेड काढण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले होते. ही बाब समजल्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने उपायुक्त मीना मकवाना यांनी दामिनी पथकाला सक्रिय होण्याचे आदेश दिले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक स्नेहा करेरवाड, उपनिरीक्षक वर्षाराणी आजले आणि महिला कर्मचारी यांचे पथक सलग दोन दिवस शिवछत्रपती कॉलेज परिसरात जाऊन रोडरोमिओवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान न्यायनगर येथील एका टवाळखोराला पकडले तेव्हा तो महिला अधिकाऱ्यासोबत वाद घालू लागला.
पोलिसांनी त्याला वाहनात बसविले तेव्हा त्याने डोके आपटून घेण्यास सुरुवात केली. त्याला पुंडलिकनगर ठाण्यात नेल्यानंतर तर त्याने चक्क आत्महत्येची धमकीच दामिनी पथकाला दिली. मी आत्महत्या करीन आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवीन, असे तो वारंवार पोलिसांना धमकावत होता. यानंतर पोलिसांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावून घेतले. त्यांच्यासमोर त्याला चांगलीच समज दिल्यानंतर त्याला प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नोटीस देऊन त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.