सुनील कच्छवे, औरंगाबाददुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा बियाणांच्या दरवाढीचेही संकट कोसळले आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) यंदा तूर, मूग, उडीद, सोयाबीन या कडधान्यांसह ज्वारी आणि बाजरीच्या बियाणांच्या किमतीतही जबर वाढ केली आहे. तुरीचे बियाणे तब्बल ७५ टक्क्यांनी तर उडदाचे दुपटीने महागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाढणार आहे. दुष्काळी परिस्थितीत खरिपाच्या पेरणीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे. त्यातच आता महाबीजने आपल्या बियाणांच्या किमतीत भरीव वाढ केली आहे. खरिपाच्या तोंडावर नुकतेच महाबीजचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे; परंतु दरवाढीमुळे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बियाणांच्या किमती पाहून धक्का बसत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तुरीच्या दरात सरासरी ७५ टक्के, ज्वारीच्या दरात सरासरी ३५ टक्के, बाजरीच्या दरात ५ टक्के, मुगाच्या दरात ५० टक्के, सोयाबीनच्या दरात ५ टक्के वाढ केली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून राज्यात कडधान्यांच्या क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे मात्र, या कडधान्यांच्या किमतीतच महामंडळाने वाढ केली आहे. बियाणे महामंडळ हा राज्य सरकारचाच उपक्रम आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या किमतीत वाढ झाल्यामुुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मराठवाड्यात कडधान्य पिकांचे दहा लाख हेक्टर क्षेत्र मराठवाड्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४९ लाख ९ हजार हेक्टर इतके आहे. त्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र हे १० लाख ६४ हजार हेक्टर इतके आहे. कडधान्य पिकांमध्ये मराठवाड्यात प्रामुख्याने तूर, मूग आणि उडदाचे प्रमाण अधिक आहे. नेमक्या याच पिकांच्या बियाणांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा तुरीचे क्षेत्र ५ लाख ८७ हजार हेक्टर, मुगाचे २ लाख १८ हजार हेक्टर आणि उडदाचे क्षेत्र १ लाख ९९ हजार हेक्टर इतके प्रस्तावित करण्यात आलेले आहे. बियाणे निर्मितीसाठी महामंडळ शेतकऱ्यांकडूनच चांगल्या प्रतीच्या मालाची खरेदी करते. त्याकरिता शेतकऱ्यांना बाजारभाव आणि त्यावर २५ टक्के बोनस दिला जातो. त्यानंतर या मालावर प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक, चाळणी, गाळणी, पॅकिंग या सर्वांचा खर्च काढून बियाणांची किंमत निश्चित केली जाते. हा सर्व खर्च वाढल्यामुळे यंदा बियाणांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. - जगदीश गिरी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज
अस्मानीनंतर आता बळीराजावर येणार सुलतानी संकट
By admin | Published: May 19, 2016 12:03 AM