सोयगाव : तालुक्यात मागील काही वर्षांपासून प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून पपई बागेचा यशस्वी प्रयोग केला जात आहे. मात्र, यंदा मे हिटचा फटका पपई बागांना बसला असून, पपईची झाडे उन्हाने होरपळली जात आहे. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र संक्रांत आली आहे.
रमजान महिन्यातच पपई बागांवर झालेल्या हिटच्या आक्रमणाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
सोयगाव परिसरात यंदा जानेवारी महिन्यातच प्लास्टिक अच्छादानाच्या साहाय्याने पपई लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला. परंतु, मे महिन्याच्या हिटमुळे पपईची झाडे होरपळली जात आहे. त्यामुळे प्लास्टिक आच्छादनाचा पपई लागवडीचा प्रयोग फसवा ठरला असल्याचे शेतकरी सांगत आहे, तर काही शेतकऱ्यांवर पपईच्या झाडांना उपटून टाकण्याची वेळ आली आहे. तालुक्यात यंदाच्या हंगामात सुमारे पन्नास हेक्टरवर प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून उन्हाळी पपईची लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चदेखील उत्पादनातून निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
मिरचीऐवजी पपईची निवड
यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामात सोयगाव परिसरात दरवर्षी प्लास्टिक अच्छादनावर मिरची लागवडीचा प्रयोग करण्यात येतो. परंतु, शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून पपई लागवड केली. परंतु, हा अंदाज चुकल्याने प्रयोग फसलेला आहे. यंदाच्या उन्हाळी पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्णय चुकला की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
090521\ynsakal75-065006506_1.jpg
सोयगाव परिसरातील पपई बागा मे हिटमुळे अशा होरपळल्या जाऊ लागल्या आहेत.