एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ गारपिटीतून रबी हंगामाचे झालेले नुकसान काही अंशी तरी भरुन निघावे, यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकर्यांनी प्रयत्न केला असून, सिंचनाची सुविधा असणार्या शेतकर्यांनी दोन हजार हेक्टर्सवर ‘उन्हाळी हंगामा’ची लागवकड केली असून, गारपिटीतून कसेबसे सावरून खरीप हंगामातील लागवडीचा खर्च काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यात ३१ हजार ५०० हेक्टर्स जमीन असली तरी लागवडीयोग्य जमीन केवळ २८ हजार ५०० हेक्टर्स आहे. त्यात खरीप आणि रबी असे दोन भाग पडतात. चालूवर्षी जवळपास १६ हजार हेक्टर्समध्ये रबीची पेरणी करण्यात आली होती. यात प्रमुख पिके म्हणजे हरभरा, ज्वारी, गहू, तूर, करडी, अशी होती. रबीचा हंगाम बहरला आणि ऐन राशीच्या मोसमात मार्च महिन्यात सलग १८ दिवस गारपीट झाली. त्यानंतरही एप्रिल महिन्यात अवकाळीचा तडाखा बसला. यात पुरता रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली. या अस्मानी संकटातून सावरायचे कसे, असा प्रश्न शेतकर्यांना पडला. परंतु, तालुक्यातील जलस्त्रोतांची पाणीपातळी समाधानकारक असल्याने सिंचनाची सुविधा असणार्या शेतकर्यांनी उन्हाळी हंगाम घेण्याचे ठरविले आणि दोन हजार हेक्टर्सवर पेरणी झाली. भुईमूग प्रमुख... गारपिटीत झालेल्या नुकसानीची थोडीफार तरी भरपाई व्हावी, या उद्देशाने अनेक शेतकर्यांनी भुईमूग हे प्रमुख नगदी पीक घेतले आहे. याशिवाय, अनेक शेतकर्यांनी सूर्यफुल, सोयाबीन, मूग, उडीद, तीळ अशी पिके घेतली आहेत. सध्या उन्हाळी हंगामातील पिके बहरल्याचे चित्र दिसून येत आहे.
दोन हजार हेक्टर्सवर ‘उन्हाळी हंगाम’
By admin | Published: May 20, 2014 12:19 AM