औरंगाबाद : लग्न, कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. रविवारी (दि.२९) औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर पोहोचला. हा पारा येत्या आठवडाभरात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घाम निघत आहे.
राज्यासह औरंगाबादचे तापमान मागील आठ दिवसांपासून चांगलेच तापत आहे. रविवारी या तापमानाने ४१ अंश गाठला. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. भर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान रस्त्यांवरील वाहतूक मंदावत आहे. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत असल्याचे रविवारी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांनी घरीच बसून राहणे पसंद केले. यातच रविवारी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमांकडेही रसिक, अभ्यासकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. उन्हाच्या तडक्यातून वाचण्यासाठी मोटारसायकलस्वार डोक्यावर हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. उन्हाचा पारा चढल्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत वीज गुल होत आहे. याचा परिणाम नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.
वीज गुल, अनेक भागांत अंधारसूतगिरी भागातील सबस्टेशनमधील तांत्रिक दोषाने रविवारी रात्री परिसरातील अनेक भागात वीज गुल झाली. रात्री ८.१४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंतही सुरळीत झाला नव्हता. परिणामी, उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
नागरिक शोधताहेत थंड ठिकाणेशहरात काही कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक उन्हाचा चटका सहन केल्यानंतर थंड होण्यासाठी रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत. ज्याठिकाणी थंड पेयाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या निवासांमध्येही उकाड्यामुळे एसी, पंखा, कूलरची चांगलीच मागणी वाढली आहे.
सिडको एन-२ परिसरात वीजपुरवठा खंडितशहरातील सिडको एन-२ परिसरात रविवारी सुटीच्या दिवशी तब्बल १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, तर आग ओकणारा सूर्य आणि घरातील गायब झालेली वीज यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागला.