तळेगावच्या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग : दीड एकर क्षेत्रात केली लागवड
रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यात नव्याने समावेश करण्यात आलेल्या तळेगाव येथील उच्चशिक्षित समाधान भगवान फलके या तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरून तालुक्यात प्रथमच ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. योग्य व्यवस्थापन व संगाेपन करीत दीड एकर क्षेत्रात चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
तळेगाव येथील उच्चशिक्षित असलेल्या समाधान फलके याने नोकरीच्या मागे न धावता वडिलोपार्जित शेतीमध्येच करिअर करायचे ठरविले. त्यांच्या शेतीत गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत कपाशी, मका, तूर ही पिके घेतली जात होती. खर्च खूप आणि त्यामानाने उत्पन्न व भावही कमी मिळत असल्याने शेती तोट्याची ठरत होती. त्यातच नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर तर मेहनतही मातीत जात होती. यामुळे समाधान याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करायचे ठरविले. ही बाब त्यांनी वडिलांना बोलून दाखविली. यानंतर त्याने कोणते पीक चांगले उत्पन्न देईल, याची चाचपणी सुरू केली. नुकतेच बाजारात चांगला दर मिळत असलेल्या व परिसरात लागवड नसलेल्या ड्रॅगन फ्रुटकडे त्याचे लक्ष वेधले. या फळाची लागवड करण्यासाठी त्याने माहिती मिळविणे सुरू केले. यानंतर सातारा येथून ड्रॅगन फ्रुटची रोपे आणून दीड एकर क्षेत्रात २०१९ मध्ये त्याची लागवड केली. सुरुवातीला अनेकांनी हा प्रयोग यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. मात्र, तो मागे हटला नाही. योग्य नियोजन व परिश्रमाने त्याने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. विशेष म्हणजे या बागेत आंतरपीकही घेतले जात असल्याने त्यापासूनही उत्पन्न मिळत आहे.
चौकट---
तालुक्यातून पहिलाच प्रयोग
समाधान फलके याने ड्रॅगन फ्रुट लागवडीचा केलेला प्रयोग हा तालुक्यातील प्रथमच आहे. बहुधा जिल्ह्यातही हा पहिलाच प्रयोग असावा. दहा एकर शेती असलेल्या समाधानने दीड एकर शेतात ड्रॅगनची बाग फुलवली आहे. यासाठी त्याला २०१९ मध्ये एकदाच चार लाख रुपये खर्च आला. मात्र, या बागेतून चांगले उत्पन्न निघत आहे.
चौकट
डेंग्यू, मलेरिया आजारामध्ये प्रभावी
ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. डेंग्यू आजार झालेल्या रुग्णाच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या असतात. या कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून रुग्णाला ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय शरीरासाठी त्याचे आरोग्यदायी लाभही भरपूर असल्याने बाजारात याला खूप मागणी आहे.
चौकट
२५ वर्षे सतत फळ देणारे झाड
ड्रॅगन फळाच्या झाडाची एकदा लागवड केली तर, यापासून सतत २५ वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. दरवर्षी उत्पन्नात भर पडत जाते. तसेच यासाठी कमी जागा लागते. या झाडांवर कोणतीही रोगराई पडत नाही. काटेरी असल्याने पक्षी, जनावरे याला खात नाहीत, रासायनिक खते, औषधींचा खर्च नाही. तसेच या बागेत आंतरपीक घेता येते.
कोट...
पारंपरिक शेतीला फाटा देत मी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. ही लागवड यशस्वी झाली असून, गेल्या तीन वर्षांपासून सतत उत्पन्न मिळत आहे. दरवर्षी उत्पन्नात भर पडत असून चार दिवसांपूर्वीच मुंबईला फळे नेऊन विकली. यातून मला साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- समाधान फलके, शेतकरी, तळेगाव
फोटो : ड्रॅगन फ्रुटची बाग, शेतकऱ्याचा फोटो