पैठण/ पाचोड: पैठण तालुक्यासाठी रविवार हा अपघात वार ठरला असून या दिवशी तालुक्यात ४ दुर्दैवी घटना घडल्या. अपघाताच्या दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. तर पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाला असून अन्य एक तरूण वाहून गेला आहे. २६ तासानंतरही हा तरूण सापडलेला नाही.
कार उलटून पती ठार; ५ महिन्यांच्या बाळासह पत्नी बचावलीपाचोड : धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडगाव जावळे शिवारात रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एक कार राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्ट्यावर आदळून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी व पाच महिन्यांचा मुलगा जखमी झाला असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील विष्णू बाबासाहेब गाडगे (वय २४ वर्षे) हे पत्नी व लहान बाळासह एका कारमधून (एमएच ०१ सीजे ६११०) छत्रपती संभाजीनगरहून गावाकडे जात असताना आडगाव जावळे शिवार एका छोट्या वळणावर विष्णू गाडगे यांचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्ट्यावर जाऊन आदळली. या अपघातात विष्णू बाबासाहेब गाडगे हे गंभीर जखमी झाले; तर रोहिणी विष्णू घाडगे (वय १९ वर्षे) व पाच महिन्यांचा मुलगा यांनाही मार लागला. याबाबत माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद्चंद्र रोडगे यांनी टोलनाक्यावर फोन करून घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका दाखल झाली. तिच्यातून तिन्ही जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी विष्णू बाबासाहेब गाडगे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी रोहिणी विष्णू गाडगे व पाच महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू आहेत. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शरद्चंद्र रोडगे करीत आहेत.
पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यूपैठण : सकाळी व्यायाम झाल्यानंतर जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास, तर तेलवाडी येथील दक्षिण जायकवाडीजवळून गेलेल्या कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला एक २४ वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पैठण शहरातील अन्नपूर्णानगर भागात राहणारा प्रमोद कोल्हे हा तरुण रविवारी सकाळी सकाळी व्यायाम झाल्यानंतर ९ च्या सुमारास दोन मित्रांसह पोहण्यासाठी जायकवाडी धरणात गेला होता. पोहत असताना प्रमोद कोल्हे हा पाण्यात बुडाला. ही बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यात यश आले नाही. ही माहिती प्रमोदच्या अन्य मित्रांना समजताच त्यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यानंतर, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, जमादार विलास सुखधान आदींनीही घटनास्थळी दाखल होऊन काही युवकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दोन तासांनंतर प्रमोदचा मृतदेह सापडला. त्यानंतर, तो पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.