- सुनील घोडके खुलताबाद - वेरूळ येथील जगप्रसिद्ध वेरूळ येथील दहा नंबरच्या लेणीत आज सायंकाळी बुद्ध मूर्तीवर अद्भुत किरणोत्सव झाला. हा नजारा डोळ्या साठवण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांनी गर्दी केली होती. हा किरणोत्सव सायंकाळी ५ वा. ३ मी. ते ५ वा. १० मिनिटे असा एकूण सात मिनिट झाला.
कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात अथवा प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी मंदिरात होणारा किरणोत्सव अनेकांनी अनुभवला असेल . सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या देवतांच्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात ते पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव असतो. अशाच प्रकारचा किरणोत्सव ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ येथील दहा नंबरच्या लेण्यातील बुद्ध मूर्तीवर अनुभवायला मिळाला. हा क्षण अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दीही झाली होती. यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ संजय पाईकराव, डॉ. भाऊसाहेब कुऱ्हाडे, अश्विन जोगदंड, योगेश जोशी, विनोद मोरे, किरण काळे आदींनी हा किरणोत्सव सोहळा पाहिला.
वर्षातून दोनच दिवस होतो किरणोत्सव स्थापत्य कलेचा अद्धभुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर उत्तरायणात सूर्यकिरणे येतात. यामुळे किरणोत्सव होऊन बुद्धमूर्ती उजळून निघते. वर्षातून दोनच दिवस १० व ११ मार्च रोजी असा किरणोत्सव होऊन बुद्ध प्रतिमा उजळून निघते.
बौद्ध स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना लेणी क्र 10 मधील बुद्धाच्या प्रतिमेवरील किरणोत्सव बौद्ध कला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. तेजस्वी सूर्य किरणांची दुसऱ्या तेजाशी भेट आहे असेच म्हणावे लागेल.- डॉ. संजय पाईकराव, बौद्ध कला व स्थापत्याचे अभ्यासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ