औरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या दीडशे कोटींच्या निधीतून घाटीत भव्यदिव्य अशी सुपर स्पेशालिटी ब्लॉकची इमारत उभी राहिली. येथे अगदी काॅर्पोरेट रुग्णालयांप्रमाणे गोरगरीब रुग्णांना घाटीत सुपर स्पेशालिटी उपचार मिळणार आहेत; पण या उद्देशालाच कोरोनाचा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासून या इमारतीत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पर्यायी जागेचा, व्यवस्थेचा विचारच होत नसल्याने सुपर स्पेशालिटी इमारत कोरोना रुग्णसेवेत अडकून पडली आहे.
घाटीत केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये, तर राज्य सरकारचे ३० कोटी रुपये अशा अर्थसाहाय्यातून सुपर स्पेशालिटी ब्लॉकची इमारत उभी राहिली आहे. वर्ष २०१६ मध्ये इमारतीचे काम सुरू झाले. हे काम २०१९ मध्ये पूर्ण होणार होते; परंतु काम रेंगाळले. अशातच २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इमारत युद्धपातळीवर सज्ज करण्यात आली. कोरोनाचा सुरुवातीचा काळ असल्याने ही इमारत महत्त्वपूर्ण ठरली; परंतु वर्ष उलटूनही ही इमारत कोरोनाच्या रुग्णसेवेतच आहे. कारण फक्त एकच, कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी घाटीशिवाय पर्याय नाही आणि घाटीत जागेची अडचण असल्याने या इमारतीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी उपचारासाठी आलेली यंत्रसामग्रीही धूळ खात पडून आहे. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर म्हणाल्या, सध्या याठिकाणी कोरोनाचे उपचार केले जात आहेत. कॅथलॅब सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होऊ शकते तत्काळ सुरू
याठिकाणी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होण्याच्या दृष्टीने कॅथलॅब प्राप्त झाली आहे. कॅथलॅब कार्यान्वित करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. काही रुग्णांची या यंत्राद्वारे चाचणी, तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळताच या अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसह हृदयविकारांवरील अन्य उपचार सुरू होऊ शकतात.
या उपचारांची प्रतीक्षाच
सुपर स्पेशालिटी इमारतीसाठी २१९ पदांच्या निर्मितीलाही मान्यता मिळाली आहे. युरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्युरॉलॉजी, कार्डियोलॉजी, निओनॅटॉलॉजी, बर्न्स-प्लास्टिक सर्जरी, आदी आठ विभागांमार्फत अतिविशेष वैद्यकीय सेवासुविधा नागरिकांना मिळणार आहे. मेंदूचे उपचार-शस्त्रक्रिया, मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियादेखील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणे अपेक्षित आहे; परंतु कोरोनामुळे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांना या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचाच रस्ता धरावा लागत आहे.
फोटो ओळ..
घाटीत उभारण्यात आलेली सुपर स्पेशालिटी ब्लॉकची इमारत.