औरंगाबाद : महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय व त्यांच्या पत्नी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना दुसऱ्यांदा क्वारंटाईन व्हावे लागले. बंगल्यावरील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये एका वाहनचालकाचा समावेश आहे. त्यामुळे दोघेही पाच दिवस विलगीकरणात राहण्याची शक्यता आहे. या दोघांच्या चाचण्यांचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
पाण्डेय आणि मोक्षदा पाटील यांच्या बंगल्यात काम करणारा स्वयंपाकी दोन महिन्यांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पाण्डेय, पाटील तसेच मुलाची कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर तिघांना क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी पाटील यांच्या वाहनाचा चालक व बंगल्यावरील चार कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे पाण्डेय, पाटील व मुलाची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. असे असले तरी तिघांची आणखी तीन दिवसांनंतर चाचणी केली जाणार आहे. तोपर्यंत ते क्वारंटाईन राहण्याची शक्यता आहे, असे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. लवकरच दुसरी टेस्टसुद्धा करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कर्मचाऱ्यांचे नातेवाईक निघाले पॉझिटिव्हपोलीस मेसजवळ पोलीस अधीक्षकांचा बंगला आहे. बंगल्यावरील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आल्याचे पाडळकर यांनी नमूद केले.