---
योगेश पायघन
औरंगाबाद : सुपरस्पेशालिटी उपचारासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचे प्रलंबित प्रश्न विक्रमी वेळेत सोडवून कोरोना रुग्णांच्या सेवेत १३ जून २०२० ला आलेल्या सुपरस्पेशालिटी ब्लाॅकने आतापर्यंत साडेचार हजार कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले. मराठवाड्यासह जिल्ह्यातील गंभीर, अतिगंभीर बाधित रुग्णांना ही इमारत वरदान ठरली. अनुभवी परिचारिका व उत्तम प्रशासकांच्या मदतीने कंत्राटी मनुष्यबळाच्या जोरावर एकाच वेळी अडीचशे रुग्णांना उपचार देणारी ही सुविधा घाटी रुग्णालयाच्या लाैकिकात भर टाकणारी ठरली.
तत्कालीन उपअधिष्ठाता व सध्याचे सुपरस्पेशालिटी विंगचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चाैधरी व त्यांच्या टीमने या इमारतीला सुरुवातीपासून कार्यान्वित करण्यासाठी कडक लाॅकडाऊनमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मार्च महिन्यात पहिला बाधित रुग्ण आढळल्यापासून जिल्हा प्रशासनाने कोरोनासाठी ही इमारत कार्यान्वित करण्यासाठी सूचना केल्या. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी यासंबंधी समन्वयाची जबाबदारी डाॅ. चाैधरी यांच्याकडे सोपवली.
सुपरस्पेशालिटी विंगला वीज व पाणीपुरवठ्याची जोडणी नव्हती. जिल्हा प्रशासनाने सुपरस्पेशालिटी इमारतीला वीज आणि पाणीपुरवठा मार्च आणि एप्रिल महिन्यात उपलब्ध करून दिला. १० केएलची स्वतंत्र ऑक्सिजन टाकी बसवून मध्यवर्ती प्राणवायूपुरवठ्याची सुविधा सुरू करण्यात आली. लाॅकडाऊनच्या काळात गोवा, अहमदाबादहून कारागिरांना बोलवून ते काम युद्धपातळीवर पूर्ण केले. यासोबत सेंट्रल एअर कंडिशन, फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित केली. डिझेल जनरेटर बॅकअप युद्धपातळीवर उभारले. हे करताना नाॅनकोविड रुग्णांसाठी डायलिसिस आणि एमआरआय सुरू केले. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रुग्णांनी या सुविधाचा लाभ घेतल्याचे डाॅ. चाैधरी यांनी सांगितले. १३ जून २०२० ला सुरू झालेल्या अडीचशे खाटांच्या या इमारतीत ५० अतिदक्षता खाटा, तर २०० ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले. त्यानंतर गत नऊ महिने या इमारतीने अखंड सेवा दिली. आतापर्यंत साडेचार हजार रुग्णांना उपचार दिला. ९० पेक्षाही अधिक वयाचे गंभीर रुग्ण या इमारतीतून बरे होऊन सुखरूप घरी परतले.
परिचारिकांनी रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी वाॅर्डात व्यायाम प्रकार शिकवले. मनोधैर्य उंचाविण्यासाठी देशभक्तीपर गीते, प्रार्थना घेतल्या. नातेवाइकांच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला, तर अन्नभांडारातून योग्य तो गुणवत्तेचा आहार वेळेत रुग्णांना उपलब्ध करून दिला. यात वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिल्पा असेगावकर, उपअधीक्षक प्रतिभा देशमुख, डाॅ. अविनाश लांब, डाॅ. दर्पण जक्कल, डाॅ. प्रभाकर जिरवणकर, डाॅ. ज्योती कुलकर्णी, बधिरीकरण डाॅ. सूचिता जोशी, डाॅ. प्रशांत पाचोरे, डाॅ. मुकुंद परचंडेकर, शेख नदीम यांच्यासह अनुभवी इन्चार्ज, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यसेवेचा दर्जा उंचावत घाटीच्या नावलाैकिकात भर घातली.